रविवार, ११ डिसेंबर, २०२२

या अंड्यामागे दडलंय काय?

 एक-दीड वर्षांपूर्वी हॉलिवूडमध्ये मिनारी नावाचा एक खूप वेगळा चित्रपट आला होता. अमेरिकेत स्थलांतर केलेलं एक कोरियन कुटुंब आणि कामधंदा मिळवण्या-करण्याचा त्यांचा संघर्ष त्यात दाखवला होता. त्यातल्या नवऱ्याला  एका कुक्कुटपालन केंद्रात नोकरी मिळते. कोंबडीची छोटी-छोटी गोंडस पिल्लं ठेवलेली असतात. एकेक पिल्लू उचलून खालून त्याचा पार्श्वभाग पाहायचा आणि कोंबडा की कोंबडी असं त्यांचं वर्गीकरण करायचं. कोंबडे वेगळे ठेवायचे आणि कोंबड्या वेगळ्या ठेवायच्या. दिवसभर तासन् तास हेच करायचं. मग नंतर एकदा कुक्कुटपालन केंद्राच्या चिमनीतून धुराचा काळा लोट बाहेर पडताना आपल्याला दिसतो आणि संवादांमधून आपल्याला समजतं, की नर असलेली सगळी पिल्लं मारून जाळून टाकली जातात. 


अंडी उत्पादनाच्या प्रक्रियेत (हो, भारतात सुद्धा!) एक दिवसाची नर पिल्लं आणि त्यांच्याबरोबरच अशक्त किंवा आजारी असलेली मादी पिल्लं यंत्रात चिरडून मारली जातात. स्वयंचलित पट्ट्यांवर ह्या पिल्लांना ठेवलं जातं आणि मग पट्टा आपोआप पुढे सरकत सरकत ह्या चिमुरड्यांना चिरडणाऱ्या यंत्रात (grinder)  टाकून देतो आणि क्षणार्धात त्यांच्या शरीराच्या चिंधड्या होतात. अंगावर काटा आला ना? पण पिल्लांना मारण्याची ही पद्धत सगळ्यात दयाळू मानली जाते आणि म्हणून सगळ्यात जास्त वापरली जाते. म्हणजे ह्याहून भयानक पद्धती आहेत? इतर पद्धती अशा  - प्लास्टिक पिशव्यांमध्ये बंद करून गुदमरवून मारणे, विजेचा झटका देऊन मारणे, हाताने एकेकाची मान मोडून ठार करणे आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे पुष्कळ प्रमाणात कार्बन डाय ऑक्साइड देऊन तडफडवून मारणे. ह्या शेवटच्या प्रकारात खूप वेदना होतात. फुप्फुसांची आग-आग होऊन बेशुद्ध पडून शेवटी पिल्लं मरून पडतात.   


(विकिपीडियावरचे चित्र) 



पण मग ही नर पिल्लं मोठी करून मांसाहारासाठी का वापरत नाहीत? एकदा एखाद्या गोष्टीचा कारखाना, उद्योग आणि नफा-तोटा झाला, की सगळं त्याच भाषेत बघितलं जातं. मांसाहारासाठी म्हणजे कोंबडी खाण्यासाठी जी कोंबडीची जात वापरतात, ती अंडी उद्योगातल्या कोंबडीपेक्षा वेगळी असते. अंडी देणाऱ्या कोंबडया ह्या बारीक आणि जास्तीत जास्त अंडी देऊ शकणाऱ्या असतात. तर खायच्या कोंबड्या (ब्रॉयलर) ह्या भराभर म्हणजे सहा-सात आठवड्यातच खूप जाड, मांसल होणाऱ्या असतात. सगळं एकदम  इष्टतम (optimize) केलेलं असतं. त्यामुळे अंडी देणाऱ्या जातीच्या नरांना आपल्या जगात जागा नाही.           


आपल्याकडे असे बरेच लोक आहेत, की जे मांसाहार करत नाहीत, पण अंडी खातात. त्यात आपण जिवंत प्राणी-पक्षी मारत नाही, असा आपला एक समज आणि समाधान असतं. पूर्वी जेव्हा लोक शेतात, घरात कोंबड्या पाळून अंडी विकायचे तेव्हा ते खरंही होतं. पण प्लास्टिक किंवा कागदी खोक्यांमध्ये छान बसवलेली आणि छोट्या किंवा मोठमोठ्या दुकानांमध्ये आकर्षक कप्प्यांमध्ये रचून ठेवलेली अंडी दिसतात तशी अजिबात नसतात. गुळगुळीत, शुभ्र दिसणाऱ्या अंड्यांच्या मागे एक भयानक काळाकुट्ट उद्योग चालू असतो. डॉक्टर म्हणतात, की प्रथिनांसाठी अंडी खा. आहारतज्ज्ञही  हेच सांगतात. शिवाय आपण कुठेतरी वाचतो, की पर्यावरणासाठी मांसाहारापेक्षा अंडी जास्त चांगली, त्यांचा कर्बठसा मांसापेक्षा कमी आहे. त्यामुळे बरेच लोक सकाळी नाश्त्याला अंडी खातात. 


कधी कधी आपल्याला अंड्यांमधले प्रकार दिसतात. म्हणजे cage-free, free-range असं त्यांच्या खोक्यांवर लिहिलेलं असतं आणि ही अंडी नेहमीच्या अंड्यांपेक्षा महाग असतात. अंड्यांच्या उद्योगात छोट्या पिंजऱ्यांमध्ये खूप कोंबडयांना कोंबलेलं असतं.  हालायला तर जागा नसतेच, पण पंख सुद्धा पसरता येत नाहीत. अत्यंत अनैसर्गिक, रोगट आणि हलाखीचं आयुष्य ह्या कोंबड्यांच्या वाट्याला येतं. युरोपियन युनियनने पिंजऱ्यांवर बंदी घातली आहे. पिंजरामुक्त (cage-free) अंडी म्हणजे कोंबड्या पिंजऱ्यात नसतात, तर गोदामात फरशीवर असतात. तिथेही कोंबड्या दाटीवाटीतच असतात आणि पिंजऱ्यापेक्षा विशेष जास्त जागा नसते, पण पिंजरा नसल्यामुळे जरा हालचाल होते. मोकळ्या (free-range) कोंबड्या ह्या पिंजरामुक्त कोंबड्यांसारख्याच फरशीवर दाटीवाटीने ठेवलेल्या असतात, पण त्यांना मोकळ्या हवेत अंगणात जायची सोय असते. अर्थात, हे अंगणही फार मोठे नसते. बऱ्याच कोंबड्यांना कधीच अंगणात जाता येत नाही. सेंद्रिय (organic) असं लिहिलेली पण अंडी मिळतात. ह्यात कोंबड्यांना दिलं जाणारं अन्न सेंद्रिय शेतीतलं असतं आणि त्यामुळे त्यात कमी प्रदूषण झालेलं असतं. पण त्यामुळे  कोंबडी पालनात इतर कुठलाही बदल होत नाही. काही अंडी जरा मोठी आणि तपकिरी रंगाची असतात. ह्यात फक्त कोंबडीची जात वेगळी असते एवढंच, बाकी सगळं सारखंच असतं. 

                                   

अंडी उत्पादनात पिल्लं मारली जातात ह्याबद्दल आता जाणीव जागृती वाढू लागली आहे. जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड अशा देशांमध्ये ह्यावर बंदी येते आहे. बऱ्याच युरोपीय देशांमध्ये no-cull म्हणजे ‘पिल्लं-न-मारता’ प्रकारची वेगळी अंडीही आता मिळू लागली आहेत. अंड्यांमध्ये असतानाच नर की मादी हे ओळखण्याचं तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न चालू आहेत. हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर वापरण्याजोगं होईल तेव्हा  ह्या उद्योगांमधलं क्रौर्य कमी होईल. शिवाय आता प्रतिमांसासारखी प्रतिअंडी (म्हणजे अंड्यासारखी चव आणि तेच पोषणमूल्य, पण वनस्पतीपासून बनलेला पदार्थ) सुद्धा मिळू लागली आहेत. आपल्या देशात अशी उत्पादनं कमी मिळतात. पण आपण मागणी वाढवली तर जास्त प्रमाणात आणि कमी खर्चात प्रतिअंडी उपलब्ध होतील. त्याखेरीज शेतात, गावाकडच्या घरात पूर्वीच्या पद्धतीने पाळलेल्या कोंबड्यांची अंडी ज्यांना मिळतात, त्यांना ती खायचा पर्याय आहेच.              


शनिवार, १० डिसेंबर, २०२२

समुद्री कारस्थान

 साधना साप्ताहिक "कर्तव्यसाधना" असे पोर्टल चालवते. त्यावर माझा "समुद्री कारस्थान" हा लेख आला आहे.

प्रकाशित लेख इथे पाहता येईल.

त्यात संपादन करताना काही बदल आणि काटछाट झाली आहे. इथे माझा मूळ लेख (संपादन न केलेला) देत आहे.


२०२१ मध्ये नेटफ्लिक्सवर  किप अँडरसन ह्यांनी निर्मिती केलेला  Seaspiracy  म्हणजे 'समुद्री कारस्थान' नावाचा दीड तासाचा माहितीपट आला आहे. हा चित्रपट तयार करणारे अली तबरिझी ब्रिटिश नागरिक आहेत. ते आपल्याला जपान, थायलंड, हॉंगकॉंग, फ्रान्स, लायबेरिया अशा वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्यांवर  घेऊन जातात आणि मासेमारीचा समुद्रावर, पर्यावरणावर आणि एकूणच आपल्या अस्तित्वावर काय परिणाम होतो आहे, ते दाखवतात. बऱ्याचदा मन घट्ट करून बघावा लागणारा, पण बघितलाच पाहिजे असा हा वास्तवपट आहे. 

अली ह्यांना लहानपणापासूनच समुद्राचे वेड होते आणि पृथ्वीवरचे ८० % जीव ज्यात राहतात, त्या भव्य समुद्राचे त्यांना सुंदर चित्रीकरण करायचे होते. पण एकेक भयाण गोष्ट समोर येत गेली आणि त्यातून हा चित्रपट साकार झाला. पोटात प्लास्टिक भरल्यामुळे मेलेले देवमासे (व्हेल) जेव्हा समुद्रकिनारी दिसू लागले, तेव्हा अलींच्या कामाची दिशाच बदलली. डॉल्फिन्स (गादामासे) आणि व्हेल्स (देवमासे) हे फक्त हुशारच नसतात तर फायटोप्लॅंकटन नावाच्या समुद्री वनस्पतींना ते खतही पुरवतात. ह्या  फायटोप्लॅंकटन वनस्पती अमेझॉन वर्षावनाच्या चौपट कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेतात आणि आपल्याला लागणारा  ८५% ऑक्सिजन देतात!  त्यामुळे डॉल्फिन्स आणि व्हेल्स वाचले नाहीत, तर आपणही वाचणार नाही!   

 सध्या १५ कोटी टन प्लास्टिक समुद्रात  तरंगत आहे आणि एक ट्रक भरेल एवढे प्लास्टिक दर मिनिटाला समुद्रात पडते आहे. त्याचे छोटे छोटे तुकडे होऊन मायक्रोप्लास्टिक बनते. आपल्या आकाशगंगेत जेवढे तारे आहेत, त्याच्या ५०० पट एवढे मायक्रोप्लास्टिक तुकडे समुद्रात तरंगत आहेत. हे समजल्यावर अली प्लास्टिक पोलीस झाले. नियमितपणे समुद्रकिनारे स्वच्छ करायला जाऊ लागले, प्लास्टिकविरोधी संस्थांना देणगी देऊ लागले, स्वत: प्लास्टिक वापर टाळू लागले.    

 नंतर त्यांना समजले, की फक्त प्लास्टिकमुळेच देवमासे मरतात असे नाही, तर त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार होते. खरे तर १९८६ पासून  जागतिक पातळीवर देवमाशांच्या शिकारीला बंदी आहे. तरीही काही देश ह्या शिकारी करतात. जपान त्यात आघाडीवर आहे. जपानी बोटी अंटार्क्टिकाला जाऊनही  देवमासे मारतात. जपानमधल्या तांजी गावात दरवर्षी ७०० हून जास्त व्हेल्स आणि डॉल्फिन्स मारतात. ह्यातले काही जिवंत पकडून  मत्स्यालयात खेळ दाखवायसाठी विकतात. पण १ जिवंत डॉल्फिन पकडतात तेव्हा १२ मारलेले असतात. कशासाठी मारत असतील एवढे व्हेल्स आणि डॉल्फिन्स? खोलात चौकशी केल्यावर समजले, की लहान मासे खाणारे हे प्राणी मारले म्हणजे मासेमारी उद्योगांना जास्त प्रमाणात मासे उपलब्ध होतात.  

 ह्याखेरीज ट्यूना मासेमारीही खूप मोठ्या प्रमाणावर चालते. समुद्रातला चित्ता म्हणून ओळखला जाणारा वेगवान ब्लूफिन ट्यूना हा सगळ्यांत महागडा म्हणून प्रसिद्ध आहे. टोकियोत एक  ब्लूफिन ट्यूना ३० लाख डॉलर एवढ्या प्रचंड किंमतीला विकला जातो! त्यांची संख्या 'धोक्यात' आलेली आहे, ३% हूनही कमी  ब्लूफिन ट्यूना शिल्लक उरले आहेत. जगात सर्व प्रकारच्या ट्यूनांचा मिळून ४२ अब्ज डॉलर्सचा व्यवसाय चालतो आणि त्यातली सगळ्यांत मोठी कंपनी मित्सुबिशी आहे. अलींशी बोलायला  मित्सुबिशीच्या लोकांनी अर्थातच नकार दिला. शार्क माशांचीही मोठ्या प्रमाणावर कत्तल होते. शार्क मारून त्यांचे पर कापतात आणि ते आशिया खंडात, मुख्यतः चीनमध्ये विकले जातात. तिथे ह्या शार्क-परांचे महागडे सूप पिणे प्रतिष्ठेचे मानले जाते. हॉंगकॉंग ह्यासाठी जास्त नावाजलेले आहे. खरे तर ह्या सूपमध्ये ना काही पोषणमूल्य असते ना विशेष चव. पण केवळ प्रतिष्ठा प्राप्त झाल्यामुळे अब्जावधी डॉलर्सचा शार्क कत्तलींचा व्यवसाय जोरात चालू आहे.  वर्षाला सरासरी १० माणसे  शार्कमुळे मरतात, पण माणूस 'तासाला' ११,००० ते ३०,००० शार्क मारतो.  समुद्रात शार्क असण्यापेक्षा शार्क नसणे जास्त धोकादायक आहे.  शार्कमुळे प्रवाळ (coral reef) जगतात. तसेच शार्कमुळे छोटे मासे पाण्याच्या पृष्ठभागाजवळ आल्याने पक्षयांना खाद्य मिळते. १९५० सालापासून आजवर समुद्रपक्ष्यांची संख्या ७०% ने कमी झाली आहे.

 ज्या प्रमाणात व्हेल, डॉल्फिन, समुद्रपक्षी आणि शार्क कमी होत आहेत, ते फक्त त्यांची शिकार केल्यामुळे नाही, असे अली ह्यांच्या लक्षात आले. जास्त माहिती मिळवल्यावर समजले , की ह्यातले बरेचसे आनुषंगिक किंवा सह-मासेमारीत मरत आहेत. म्हणजे मासे पकडताना जाळ्यात हे व्हेल, शार्क अडकतात आणि तेही पकडले जाऊन मरतात. ही झाली सह-मासेमारी. उदा. वरती जे  शार्क मारण्याचे प्रचंड आकडे दिले आहेत, त्यातले निम्मे शार्क हे उगीचच सह-मासेमारीत मरतात आणि कचरा म्हणून लगेचच उलटे समुद्रात फेकले जातात. एकूणच मासेमारीचे मोठमोठे उद्योग जे कुठले मासे आणि  इतर जीव पकडतात, त्यातले ४०% निरुपयोगी म्हणून उलटे पाण्यात फेकून देतात. पाण्यात जाईपर्यंत ते मरून गेलेले असतात. ही सह-मासेमारी म्हणजे आपल्या दृष्टीआडचे बळी आहेत. हे अपघात नसतात. मासेमारीच्या अर्थकारणात ही सह-मासेमारी एक घटक म्हणून धरली जाते आणि त्यानुसार भाव ठरवले जातात. ही सह-मासेमारी  रोखायला काही नियम व कायदे अस्तित्वात आहेत. पण जगभर  ४६ लाख मोठ-मोठे ट्रॉलर्स आणि शक्तिशाली बोटी औद्योगिक मासेमारी  करत असतात.  त्यांच्यावर लक्ष ठेवणे इतके कठीण आहे, की देशोदेशींच्या सरकारांनी ते सोडूनच दिले आहे. सी शेफर्डसारख्या सामाजिक संस्था यथाशक्ती प्रयत्न करतात. पण त्यांची शक्ती मर्यादित आहे. मात्र त्यांच्याकडे बरीच माहिती उपलब्ध आहे. उदा. फ्रान्सच्या अटलांटिक किनाऱ्यावर  दरवर्षी १०,००० डॉल्फिन्स केवळ सह-मासेमारीत मारले जातात आणि फ्रेंच सरकार ही गोष्ट लपवून ठेवते. लोकांना माहीत नसते, की ते जेव्हा मासे खातात तेव्हा त्यासाठी डॉल्फिन्स मारले जातात. "डॉल्फिन सुरक्षित ट्यूना" असे लेबल लावून जगभरात कितीतरी मासेविक्री होते. पण प्रत्यक्षात ती मोठी फसवणूक कशी आहे आणि नुसते असे लेबल विकून लोक पैसे कसे कमवतात ते विस्ताराने दाखवले आहे.  थोडक्यात म्हणजे, आपण मासे खाणे हे सुद्धा शार्क, व्हेल ह्यांची शिकार करण्यासारखेच आहे.  ह्याखेरीज कोळंबी पकडण्याच्या उद्योगात थायलंडमध्ये कशी गुलामी आहे, तेही दाखवले आहे. लोकांना जबरदस्तीने ८-८, १०-१० वर्षे कोळंबी पकडणाऱ्या बोटींवर ठेवले जाते आणि राबवून घेतले  जाते. सध्या  मिळते तेवढी स्वस्त कोळंबी  ह्या गुलामीखेरीज  मिळाली नसती, हे  विदारक  सत्य दाखवले  आहे. 

काही संघटना, संस्था समुद्रातल्या प्लास्टिकबद्दल कार्यरत आहेत. पण ते लोकही समुद्रातली मासेमारीची जाळी आणि इतर साहित्य ह्यावर मौन बाळगून आहेत. वास्तविक समुद्रातल्या प्लास्टिकमध्ये ४६% प्लास्टिक हे मासेमारीचे जुने साहित्य आणि वापरून झालेली जाळी हे आहे आणि माशांना मारण्यासाठीच ते तयार केलेले असल्याने प्लास्टिक बाटल्या-पिशव्यांपेक्षा जास्त घातक आहे. उत्तर ध्रुवासारख्या दूर ठिकाणी सुद्धा अशी जुनी जाळी आढळतात. अलींनी समुद्रातल्या प्लास्टिकवर काम करणाऱ्या संस्थांची भेट घेऊन ह्याबाबत विचारणा केली. पण ह्या प्लास्टिक जाळ्यांविरोधी भूमिका घ्यायला ते लोक तयार झाले नाहीत. नंतर अलींनी शोधून काढले, की हे लोक मोठमोठ्या मत्स्यउद्योगांबरोबर काम करतात. त्यांचे हितसंबंध कसे गुंतलेले आहेत, ते आपल्याला बघायला मिळते.

प्लास्टिक ही मोठी समस्या आहेच. पण सगळ्यांत मोठी आणि महत्त्वाची समस्या औद्योगिक मासेमारी हीच आहे. पूर्वी जे छोटे छोटे नावाडी मासेमारी करत असत, तशी ती आता उरली नाही. त्याचा भयानक, अक्राळविक्राळ उद्योग झाला आहे आणि त्याने छोट्या, स्थानिक कोळ्यांच्या पोटावर पाय दिला आहे. हे आधुनिक उद्योग मोठया बोटी आणि ट्रॉलर्स  वापरतात. ट्रॉलर म्हणजे समुद्राच्या तळापर्यंत जाळे ओढत नेणारी बोट असते. ट्रॉलरचे सगळ्यात मोठे जाळे एवढे मोठे असते, की त्यात १३ मोठी विमाने मावतील! समुद्राचा तळ घासत हे जाळे जाते आणि त्यातून काही म्हणजे काही वाचत नाही. जंगलातून बुलडोझर फिरवल्यासारखे भयंकर आहे हे! आणि मासे खाणाऱ्या माणसाला ह्याचा पत्ताच नसतो.  २७०० अब्ज मासे दरवर्षी पकडले जातात. म्हणजेच दर मिनिटाला ५० लाख मासे मारले जातात. हे असेच सुरू राहिले, तर २०४८ पर्यंत जवळजवळ सगळे मासे संपतील आणि समुद्र मृत होऊन जाईल आणि मग आपले अस्तित्वही धोक्यात येईल. जगातला ९३% कार्बन डाय ऑक्साइड हा समुद्री वनस्पतींमुळे समुद्रात जातो आणि त्या वनस्पतींचा आता वेगाने नाश होतो आहे. जमिनीवर दरवर्षी २.५ कोटी एकर जंगल नाहीसे होते. पण ट्रॉलर्सच्या जाळ्यांनी समुद्राच्या तळाशी ३.९ अब्ज एकर जमिनीचे दरवर्षी निर्वनीकरण होते. त्यावर कुणी का बोलत नाही? पर्यावरण कार्यकर्ते आणि संस्थांनी हा विषय प्राधान्याने घ्यायला हवा. समुद्र जगवायचा असेल, तर त्याच्याशी खेळू नका, त्याच्या वाटे जाऊ नका आणि मासे खाऊ नका; असे अली आणि इतर तज्ज्ञ या माहितीपटात वारंवार सांगतात.      

काही लोक शाश्वत मासेमारीबद्दल बोलतात. पण 'शाश्वत मासेमारी' असे काही नसतेच आणि कुठला मासा वैध मार्गाने मारला आहे आणि कुठला नाही हे कळायला काहीच मार्ग नाही, हे अली दाखवून देतात. शाश्वत मासेमारी करून मासे खावेत इतके मासेच नाहीत. म्हणून मासे न खाणे, मागणी कमी करणे हाच उत्तम उपाय आहे. काहीजण मत्स्यशेती हा उपाय सुचवतात. ह्यात काही अवैध नाही, सह-मासेमारी नाही, समुद्राच्या तळाची हानी नाही म्हणून हा उपाय  वरकरणी चांगला  आणि शाश्वत वाटतो. पण मत्स्यशेतीतल्या माशांना खाद्य म्हणून वाळवलेले मासे आणि माशांचे तेल देतात. १ किलो साल्मन  मासा वाढवायला १.२ किलो सुके मासे लागतात. ते मासे औद्योगिक मासेमारीतूनच येतात. म्हणजेच मत्स्यशेती ही छुपी मासेमारी आणि छुपा विनाश आहे. माणूस जे मासे खातो, त्यातले ५०% अशा मत्स्यशेतीतून म्हणजेच समुद्रातल्या ठिकठिकाणच्या पिंजऱ्यांमध्ये कोंबलेल्या हजारो माशांमधून येतात. गर्दीत, स्वतःच्या विष्ठेत हे  मासे फिरत असतात, त्यांना वेगवेगळ्या रोगांची लागण होते, अंगावर  समुद्री उवा होतात. निम्मे मासे वेगवेगळ्या रोगाने मरतात. उरलेले जे अन्न म्हणून आपल्याला मिळतात, तेही फारसे निरोगी नसतात. मत्स्यशेतीतले साल्मन  कधीच गुलाबी नसतात; त्यांना रंग दिलेला असतो. माशांच्या शरीरात मज्जासंस्था असते. त्यांना भीती वाटते, वेदना होतात. त्यांचेही सामाजिक जीवन असते. ह्या कशाचीही तमा न बाळगता त्यांना क्रौर्याने हाताळले जाते.

पण आपण तर नेहमी ऐकतो, की पोषक आहारासाठी मासे खायला हवे. मग मासे नाही खाल्ले तर कशाकशाची उणीव भासेल? माहितीपटातले  डॉक्टर आपल्याला सांगतात, की विषारी पारा, प्लास्टिकचे अगदी बारीक तुकडे आणि इतर प्रदूषक गोष्टींची नक्की उणीव भासेल! सध्याच्या काळात माशांमधून मिळणाऱ्या पोषक घटकांपेक्षा  प्रदूषित गोष्टींमुळे होणारा तोटाच जास्त आहे. खरे म्हणजे ओमेगा-३ फॅटी ॲसिड पोटात जावे म्हणून मासे खाणे चांगले असते. पण हे ॲसिड मासे तयार करत नाहीत. पाण्यातल्या एका प्रकारच्या शेवाळ्यात ते तयार होते आणि मासे ते खातात; म्हणून ते माशांमध्ये असते. मग सरळ समुद्री वनस्पतींपासून तयार होणारे प्रतिमांसाचे पदार्थच का खाऊ नयेत? चवीला माशासारखेच लागणारे, आरोग्यासाठी जास्त चांगले (पारा नाही, कोलेस्टेरॉल नाही) आणि  पर्यावरण-स्नेही असे हे पदार्थ आता उपलब्ध  होऊ लागले आहेत.  त्यामुळे समुद्र वाचवायला आपण स्वत:पासून सुरुवात करायची असेल, तर मासे खाणे बंद केले पाहिजे. 

हा वास्तवपट पाहताना काही दृश्ये अंगावर येतात. व्हेल माशांच्या मोठ्या प्रमाणात शिकारी करून रक्ताळलेले लाल लाल पाणी, शार्कच्या प्रेतांचा खच, त्यांचे सपासप कापले जाणारे पर आणि हा उद्योग चालवणाऱ्यांची दहशत बघून पृथ्वीवरचा सर्वांत भयंकर व संहारक प्राणी कोण आहे ते स्वच्छ दिसू लागते. अली तबरिझी ह्यांनी बऱ्याचदा जीव धोक्यात घालून चित्रीकरण केले आहे. त्यांनी अत्यंत कळकळीने आपल्या सगळ्यांचे डोळे उघडण्याचे अमूल्य काम केले आहे. किनारे स्वच्छ करणे, प्लास्टिक न वापरणे आणि मुख्य म्हणजे मासे न खाणे ह्यातूनच आपण त्यांचे खरे आभार मानू शकतो.



सायानो बॅक्टेरियांचे उद्योग

image credit: https://www.deq.ok.gov   “वातावरणात मुख्यतः नायट्रोजन आणि कार्बन डाय ऑक्साइड आहेत. शिवाय मिथेन आहे आणि ऑक्सिजन अगदी नावालाच आह...