| image credit: https://www.deq.ok.gov |
“वातावरणात मुख्यतः नायट्रोजन आणि कार्बन डाय ऑक्साइड आहेत. शिवाय मिथेन आहे आणि ऑक्सिजन अगदी नावालाच आहे, नसल्यासारखा. सूर्याची तीव्रता मंद असली तरीही पृथ्वीवर चांगली उष्णता आहे.” हे कुठल्या विज्ञानकथेतलं वर्णन नाही आणि तापमानवाढीमुळे जगात काय होऊ शकतं, ते सांगणारं भविष्यातल्या शक्यतेचं चित्रही नाही. हे भविष्य नसून हा भूतकाळ आहे. जेव्हा पृथ्वीवर वनस्पती सुद्धा अवतरल्या नव्हत्या आणि सूर्याची उष्णता आजच्या फक्त ७०% होती, तेव्हाचं म्हणजेच सुमारे साडे तीन अब्ज (३.५ बिलियन) वर्षांपूर्वीचं वर्णन आहे. सूर्याची उष्णता कमी असली, तरी हवेतल्या वायूंमुळे हरितगृह परिणाम होऊन पृथ्वीवर द्रव रूपात पाणी राहू शकेल असं तापमान होतं.
आणि आता? आता हवेत सुमारे २०% ऑक्सिजन आहे. कशी काय झाली ही किमया? त्या काळी सायानो बॅक्टेरिया नावाचे सूक्ष्मजीव निर्माण झालेले होते. प्रकाश संश्लेषण करून हवेत ऑक्सिजन सोडणारे हे आद्य म्हणजे पहिले जीव धरले जातात. पृथ्वीच्या ऑक्सिजनीकरणाचं श्रेय त्यांना जातं. सायानो बॅक्टेरियांनी सोडलेला ऑक्सिजन सुरुवातीला समुद्रात विरघळत असे किंवा लोखंडासारख्या धातूंशी प्रक्रिया होऊन त्याची ऑक्साइड होत असत. पण एका टप्प्यावर समुद्र संपृप्त झाले, त्यात अजून ऑक्सिजन विरघळेना आणि सगळे ऑक्साइडही तयार झाले. मग हा ऑक्सिजन हवेत जाऊ लागला आणि त्याचं प्रमाण वाढू लागलं. हवेतल्या मिथेनशी प्रक्रिया होऊन पाणी आणि कार्बन डाय ऑक्साइड तयार होऊ लागले. हा कार्बन डाय ऑक्साइड वापरून पुन्हा सायानो बॅक्टेरिया अजून ऑक्सिजन सोडू लागले! हवेतला मिथेन नगण्य होत गेला आणि कार्बन डाय ऑक्साइडही खूप कमी झाला. म्हणजे काय झालं, तर वातावरण बदल झाला!
आणि ह्या वातावरण बदलाचे परिणाम? त्या काळचे बरेच जीव (हे सूक्ष्म जीव होते) हे कायमचे नष्ट झाले, नामशेष झाले. प्रचंड प्रमाणावर विनाश झाला. त्यानंतर मग ऑक्सिजनवर जगणाऱ्या पेशी आल्या आणि त्यातूनच पहिल्यांदा बहुपेशीय जीव तयार झाले. त्यानंतर पुढे वनस्पती आणि प्राणी निर्माण झाले. म्हणजे आपल्या डोळ्यांना न दिसणारा सूक्ष्म जीव, सायानो बॅक्टेरिया, त्याच्या जीवनशैलीमुळे पृथ्वीच्या वातावरणात आणि जीवसृष्टीत एवढा मोठा बदल करू शकतो! तर त्याच्यापेक्षा कितीतरी प्रगत आणि क्लिष्ट रचनेचा माणूस जग किती बदलू शकेल?! वातावरण बदल, तापमान वाढ आणि आपली जीवनशैली हे दुर्लक्ष करण्याचे विषय नाहीत.
